रुपवती सजल्या मंदिरी सौदामिनी दुर्गासिनी
लोकजन पुजिती सालबाई कुलस्वामिनी
हो प्रसन्न आता वरदान दे कुलदेवते
जनरक्षिते तारणकरिते हे महालक्ष्मी अंबीके
दिसें सुंदर मुर्ती कोरीव मोहक रुपवान
नयन सौदामिनी तेज भासे विलक्षण
भरीला कुंकु-चंदनाचा मळवट लल्लाटावरी
रेखीव नक्षीदार साडी शोभे श्वेत अंगावरी
त्यास देखुनी लोपला चंद्र चालला आकाशावरी
स्वर्णांकित मुकुट वसे चमकदार माथ्यावर
जडीला माणिक रत्न लाल शोभे प्रकाशावर
रत्नजडीत हिऱ्याची नथ दिसे नाजुक नाकावर
स्वर्णहार माळीला शोभीला कंठावर
त्यावर रूळला चंपक हार फुलांवर
गुलाब जाई शेवंती बटमोगरा कमानीवर
अलंकारिक कमर पट्टा तो कटीवरी
देखणा भरजारी पदर शोभीला साडीवरी
किती त्या चमकल्या रुपील्या चुणीदार निऱ्या
पद कोमल किती नुपूरे आणि घागऱ्या
नवदिनी नवरात्री मंगल समय असे
तेजपुंजाची नवदुर्गा उजळून दिसें
भक्तीरस तुझ्यापुढे ओसंडून वाहे
नवसाची ओटी रास तुझ्या पदरी पडे
नवरात्री खेळ मांडीला उभे भक्त तुझ्यापुढे
तु जुनी-जाणती आदिशक्ती स्वर्गवासी महिषासुरिणी गं
देवी तुला पुजितो आज तुझे नवजात भक्त पुजारी गं
मानुन घे ही आमुची सत्वर पुजा नारायणी गं
भक्तीभावे तुझ पुजिती तु अंबाबाई महालक्ष्मी
किती गं तुला वर्णु मी मज पाव आता कुलस्वामिनी
संकटी तुज वाचुनी मज कोण रक्षिल कुलदेवते
भक्तीस्मरुनी प्रसन्न हो आता पाव हो अंबीके जगदम्बिके
भक्तीस्मरुनी प्रसन्न हो आता धाव हो कुलस्वामिनी कुलदेवते
भक्तीस्मरुनी प्रसन्न हो आता धाव हो कुलस्वामिनी कुलदेवते