जय देवी जय देवी जय नवदुर्गे माते ।
महिषासुरमर्दिनी रक्षी भक्तांते ॥ धृ० ॥
जुवारीच्या तटी तुझे सुंदर सदन ।
सिद्धनाथाच्या चरणी तुझे हे नमन ।
कार्तिकी पौर्णिमेचा जत्रोत्सव थोर ।
भक्तीचा सागर लोटे, अलोट हा पूर ॥ जय देवी० ॥ १ ॥
चतुर्भुज रूप तुझे, कांती सावळी ।
अभय देऊनी रक्षी, भक्तां सांभाळी ।
सिध्दनाथ डोंगर देई, तुजला साथ ।
भक्तावरी, सदा तुझा हात ॥ जय देवी० ॥ २ ॥
सिद्धेश्वर, गोपाळकृष्ण आणि साईंचे दर्शन ।
स्वामी जगन्नाथ बुवा झाले, तुझ्या चरणी लीन।
पावित्र्य या भूमीचे, करी धन्य मन ।
अगाध तुझी कीर्ती, अनुपम तुझी सीमा ॥ जय देवी० ॥ ३ ॥
दु:ख कष्ट निवारी, देवी नवदुर्गे ।
सुख शांती देई आम्हा, तुझ्याच मार्गे ।
शरण आलो आई, चरणी तुझ्या आता ।
उदोजयकार असो, तुझा जगन्माता ॥ जय देवी० ॥ ४ ॥
जय देवी जय देवी जय बोरीच्या माते ।
महिषासुरमर्दिनी रक्षी भक्तांते ॥